उद्योगनगरीमधील कामगार कुटुंबियांना सुविधा द्या – शंकर पाटील

0
106

कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर यांच्याकडे मागणी

 ट्युडे प्रवाह  –  पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून नावारुपाला आले आहे. याठिकाणी एमआयडीसी परिसर मोठ्या प्रमाणात आहे. शहरात रोजगारासाठी ग्रामीण भागातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने येत आहेत. कामगार आणि कामगारांच्या कुटुंबियांसाठी सुविधा मिळत नसल्याने सुविधांचा वानवा प्रामुख्याने या ठिकाणी जाणवत आहे. तरी, महाराष्ट्र शासनाच्या कामगार विकास मंडळाच्यावतीने कामगारांना सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपा कामगार आघाडीचे उपाध्यक्ष शंकर पाटील यांनी केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे कामगार, भूकंप पूनर्वसन, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

 निवेदनात म्हटले आहे की, आशिया खंडात सर्वात मोठी एमआयडीसी पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी येथून उपलब्ध होतो. पिंपरी- चिंचवड या ठिकाणी दळवीनगर परिसरामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र आहे. त्याठिकाणी २ एकर मोकळा प्लॉट मंडळाच्या स्वतःच्या मालकीचा आहे. त्या केंद्राच्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण स्वरुपाची झालेली आहे. तरी, त्याठिकाणी नवीन इमारत बांधणे, मुंबई व पुणे प्रमाणेच याठिकाणी कामगार कल्याण मंडळाचा स्वःमालकीचा जलतरण तलाव उभारणे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, प्रशस्त असा सभागृह उभारणे आवश्यक आहे. या सुख-सुविधा उपलब्ध झाल्यास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होणार आहे. तसेच, कामगारांचे कुटूंबिय देखील सुविधांपासून वंचित राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील कामगार आणि त्यांच्या कुटूंबियासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. महाराष्ट्र शासनाने मंडळाला पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नेहरु स्टेडीयम पिंपरी येथील २८ एकर जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, ही जागा महानगरपालिकेने घेतली व त्या बदल्यात शहरात विविध ५ ठिकाणी जागा देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आजतायागत फक्त दोनच ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली असून उर्वरित ३ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली नाही. शहरात कायम आणि कंत्राटी असे एकूण पाच ते साडेपाच लाख कामगार आहेत. मात्र, कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयासाठी जागा नसल्याने अनेक कामगार सुख सुविधा व योजनांपासून वंचित राहत आहेत. तरी शासनाने या प्रकरणाबाबत सकारात्मकरित्या विचार करून कामगारांना योग्य तो न्याय द्यावा, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + 3 =