टुडे प्रवाह – एकनाथ खडसेंवरील बेहिशेबी मालमत्ताच्या आरोपांबाबत काय कारवाई केली असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्तेचे आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टात शुक्रवारी दमानिया यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. राज्य सरकारने खडसेंवरील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा हायकोर्टाने सरकारला केली. हायकोर्टाकडून विचारणा झाल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

पुण्यातील भोसरीमधील जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसे अडचणीत आले होते. जमीन खरेदीच्या या प्रकरणामुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारला अहवाल दिला होता. खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचे समितीने म्हटले होते. मात्र खडसेंविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस समितीने केली नव्हती. त्यामुळे खडसेंना मोठा दिलासा मिळाला होता. खडसेंचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार अशी चर्चाही पुन्हा सुरु झाली होती. मात्र आता बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणामुळे खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + three =