टुडे प्रवाह – 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतल्या जी २० शिखर परिषदेत दहशतवादाविरोधात सगळ्या देशांनी एकत्र येत लढण्याचा मुद्दा उचलून धरत एक अॅक्शन प्लानच जगासमोर ठेवला आहे. जगातले काही देश दहशतवाद्यांना राजकीय हेतू साधण्यासाठी आश्रय देत आहेत, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.

आयसिस, अल कायदा या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानल्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत आणि दहशतवाद पसरवत आहेत. मिडल ईस्टमध्ये अलकायदा, दक्षिण आशियात लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि नायजेरियात बोको हरम यांसारख्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. या संघटना वेगवेगळ्या असल्या तरीही निष्पाप आणि निरपराध माणसांचा जीव घेणे आणि समाजात तेढ निर्माण करणे हाच यांचा मुख्य उद्देश आहे.

दहशतवादी संघटना जगभरातल्या तरूणांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, यासाठी विविध प्रकारच्या योजना रचत आहेत. तरूणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सायबर स्पेस, इंटरनेट, सोशल मीडिया यांचाही वापर करत आहेत. त्याचमुळे दहशतवाद ही जगापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे, त्याचा सामना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करायला हवा असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हा विषय आता भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे, या परिषदेत दहशतवादाविरोधात लढण्याचा विषय आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चॅन्सलर एंजेला मार्केल यांचेही कौतुक केले आहे. दहशतवादाविरोधात आपण सगळ्या देशांनी एकत्र येऊन त्याचा सामना केला पाहिजे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

काय आहे दहशतवादाविरोधात मोदींची दशसूत्री?
१) दहशतवाद ही जगापुढची मोठी समस्या आहे, दहशतवादाला पाठिंबा देण्याऱ्या देशाच्या अधिकाऱ्यांवर जी २० परिषदेत बंदी घालणे.
२) संशयित दहशतवाद्यांच्या यादीचे, जी २० च्या देशांमध्ये देवाणघेवाण होणे आवश्यक आणि जे दहशतवादी जाहीर झाले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी ठोस योजना करणे.
३) दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सगळ्या देशांचा आपसांत सहभाग, प्रत्यार्पण प्रक्रिया जलद आणि सोपी करणे
४) आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात जागतिक स्तरावरची व्यापक परिषद त्वरित आय़ोजित करणे.
५) युनायडेड नेशनचे सुरक्षेबाबतचे उपाय आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रक्रियांची तातडीने अंमलबजावणी करणे.
६) धार्मिक तेढ वाढवणाऱ्यांविरोधात जी २० च्या देशांमध्ये उपायांची आणि विचारांची देवाणघेवाण, सर्वात चांगल्या उपयांवर अंमलबजावणी करणे.
७) एफटीएफ अर्थात फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स आणि इतर प्रक्रियांद्वारे दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक मदत रोखणे, आर्थिक मदतीचे पर्यायही गोठवणे.
८) एफटीएफ प्रमाणेच शस्त्रांच्या आणि स्फोटकांच्या तस्करीवर आणि खरेदी विक्रीवर बंदी घालण्यासाठई वेपन अँड एक्स्प्लोझिव्ह अॅक्शन टास्क फोर्सची स्थापना करणे.
९) जी २० देशांकडून सायबर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना योजण्यावर भर देणे.
१०) जी २० देशांमध्ये एक दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी आणि उपाय योजण्यासाठी सुरक्षा सल्लागारांची नेमणूक करणे. जर्मनीतल्या जी २० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही दशसूत्री मांडली आहे. दहशतवाद रोखण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलेच पाहिजे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत सहभागी झालेल्या सगळ्या देशांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + eleven =