टुडे प्रवाह भाजपशी हातमिळवणी केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला तरी, विधान परिषदेतील सभागृह नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांखालोखाल ज्येष्ठता यादीत दुसरे स्थान राहणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंत्रिमंडळ ज्येष्ठतेबाबत तसे सुधारित आदेश जारी केले आहेत.

मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री कोण अशी नेहमी चर्चा असते. उपमुख्यमंत्री यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकावर असते. उपमुख्यमंत्रिपद नसेल त्यावेळी साधारणत महसूलमंत्र्यांचे मंत्रिमंडळात वरचे स्थान मानले जाते. परंतु मंत्र्यांचा ज्येष्ठताक्रम ठरविण्याचा अधिकार मुख्यंमत्र्यांना दिलेला आहे.

राज्यातील विद्यमान भाजप-शिवसेना मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद नाही. त्यामुळे यापूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि आता या खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मानले जाते. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने १८ ऑक्टोबरला एक परिपत्रक काढून ज्येष्ठताक्रमाबाबत सुधारित आदेश जारी केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनंतर विधान परिषदेतील सभागृह नेत्याचे ज्येष्ठता सूचीत वरचे स्थान निश्चित करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील सध्या सभागृह नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनंतर मंत्रिमंडळात त्यांचा दुसरा क्रमांक राहील.

राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. राणे हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिष्टाचार म्हणून मंत्रिमंडळातील त्यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे राहिले असते. परंतु ते स्थान आता सभागृह नेत्यासाठी निश्चित केल्याने चंद्रकांत पाटील वरच्या स्थानावर राहतील. त्यांचे खाते बदलले तरी सभागृह नेता म्हणून त्यांच्या ज्येष्ठताक्रमात कोणताही बदल होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =