पिंपरी- चिंचवड मधील सहा मेट्रो स्थानके वेळेत पूर्ण होणार – डॉ. ब्रिजेश दिक्षित   

0
849

टुडे प्रवाह – पिंपरी चिंचवड शहरासह पुणेकरांनाही उत्सुकता लागून राहिलेल्या मेट्रो च्या उभारणीला आता सुरुवात झाली असून पिंपरी- चिंचवड भागातील मेट्रोची सहा स्थानके ही वेळेत पूर्ण होतील असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी व्यक्त केला. पिंपरी- चिंचवड भागात होत असलेल्या मेट्रोच्या कामाची देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. दिक्षीत बोलत होते. महामेट्रोच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम् हेही यावेळी उपस्थित होते.

डॉ. दिक्षीत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन केल्यानंतर नियोजित कालावधीत या दोन्ही ठिकाणच्या कामांना सुरुवात झाली आहे. मेट्रोसाठी लागणारा पहिला खांब पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात आला असून मेट्रोची पहिली सहा स्थानके आम्ही नियोजित वेळेत पूर्ण करू. पिंपरी चिंचवड परिसरात संत तुकाराम नगर येथे ‘मेट्रो माहिती केंद्र सुरु होत असून, पुणे शहरातही लवकरच असे केंद्र सुरु होणार आहे.

याशिवाय फुगेवाडी येथे मेट्रोचे कार्यालय देखील सुरू करण्यात येणार असून शहरातील एमएसआरटीसीचे बस थांबे व संत तुकाराम नगर येथे मेट्रोची संपर्क व संयुक्त केंद्र आणि माहिती केंद्रे देखील असणार आहे. मेट्रो निगडी पर्यंत असावी या नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत काम करीत असताना निगडी मार्ग लक्षात घेत आम्ही स्थानकांचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करू.

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून, मेट्रोचे बांधकाम होणार असल्याने वाहतुकीवर त्याचा कमीत कमी ताण कसा पडेल, याचा विचार करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने हे काम केले जाणार असून, तेवढ्याच अंतराच्या रस्त्यावर दुसरीकडे वळण दिले जाईल. काम शक्यतो रात्रीच्या वेळेमध्ये आणि प्रिकास्ट पद्धतीने होणार असून सुरक्षेची संपून काळजी मेट्रोच्या वतीने घेतली जात असल्याचेही डॉ. दिक्षीत यांनी स्पष्ट केले.

मेट्रोमध्ये देण्यात येणा-या बाकीच्या सुविधांबरोबरच पादचा-यांसाठी पादचारी मार्ग हा देखील एक महत्त्वाचा भाग प्रकल्पामध्ये असणार आहे. याबरोबरच दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने ‘पुणे मेट्रो’चा जो प्रकल्प अहवाल तयार केला आहे, त्यामध्ये मेट्रोमुळे ६८५ झाडे जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र यांतील जास्तीत झाडे वाचविण्याचा प्रयत्न असून, काही झाडांचे पुनर्प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आकुर्डी येथे ५ एकर जागेमध्ये ‘पुणे मेट्रो’तर्फे ‘महाराष्ट्र इको पार्क’ तयार करण्यात येत असून, पुण्यात पाचगाव पर्वती येथेही ‘मेट्रो वनविहार’ तयार करण्यात येत आहे. या वनविहारामध्ये सुमारे ३००० हजर झाडे लावण्यात येणार असून, एकूण ७००० झाडे लावण्याचे नियोजन असल्याचे, दीक्षित यांनी यांनी यावेळी सांगितले.

याबरोबरच मेट्रो प्रकल्पाबद्दल सामान्य नागरिकांना माहिती व्हावी, त्यांच्या मनातील शंकांचे निरसन व्हावे यासाठी महामेट्रोच्या वतीने ठिकठीकाणी ‘मेट्रो संवाद’चे आयोजन करण्यात येत असून नागरीकांनी यांमध्ये सहभागी होत आपली मते नोंदवावी, असे आवाहन देखील डॉ. दिक्षीत यांनी यावेळी केले. याबरोबर अनेक बस स्थानकांवर देखील मेट्रो माहिती केंद्र सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी देखील ही सर्व माहिती उपलब्ध असल्याचे दिक्षित यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen + three =