उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

टुडे प्रवाह  – फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थीची यादी विधानसभेत जाहीर करा या मागणीचा पुनरुच्चार करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला जोरदार चिमटे काढले. कर्जमुक्तीचे आकडे सत्यावर आधारित असावेत, म्हणजे आमचा तुमच्यावर जो काही विश्वास आहे तो दृढ होईल, असा टोलादेखील ठाकरे यांनी लगावला. भाजपने ३५० जागांचे लक्ष्य ठेवून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जशी तयारी सुरू केली आहे, तशीच तयारी आम्हीही सुरू केली असून ‘दुप्पट जागांवर विजय’ हे आमचे लक्ष्य राहील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेना भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीचे स्पष्ट संकेत दिले. भाजपशी मुकाबला करण्यासाठी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवा आणि रस्त्यावर उतरून तयारीला लागा असा आदेशही त्यांनी या बैठकीत दिले. राज्यात कर्जमुक्तीचे वादळ घोंघावत आहे, तर देशाच्या सीमेवर अशांतता आहे. या पाश्र्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलेल्या एका विधानाचा समाचार घेत ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवरही खरमरीत टीका केली. राज्याच्या निवडणुकीत पराभूत झालो तर केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून जाईन हे पर्रिकरांचे विधान आक्षेपार्ह असून संरक्षण खात्याच्या मंत्रिपदाचा असा खेळखंडोबा करू नका, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. राज्यात संपूर्ण कर्जमुक्तीमुळे माजणाऱ्या अराजकाहूनही संरक्षणमंत्री नसण्याने माजणारी अराजकता भयावह असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आकडे सरकारने विधानसभेत दिल्यावरही आम्ही ते तपासून पाहू, कारण यंत्रणेवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे, असा टोलाही ठाकरे यांनी हाणला. ८९ लाख शेतकऱ्यांची नावे आणि पत्ते तसेच ज्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल अशांची नावे व पत्ते आम्ही पडताळून पाहणार आहोत, त्यामुळे ही माहिती सत्यावर आधारित असली पाहिजे, जेणेकरून आमचा तुमच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ होईल, अशी खोचक टिप्पणीही ठाकरे यांनी फडणवीस यांना उद्देशून केली. अवाजवी ताकदीच्या भ्रमात राहू नका, जनतेच्या शक्तीशी अहंकाराने वागले तर काय होते, त्याचा धडा शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाने दिला आहे, असेही त्यांनी फडणवीस सरकारला बजावले.

विदर्भाची जबाबदारी रावतेंकडे 

आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकदही दुप्पट वाढविण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले असून त्यादृष्टीने काही संघटनात्मक जबाबदाऱ्यांचेही वाटप आजच्या बैठकीत ठाकरे यांनी केले. त्यानुसार, विदर्भाची जबाबदारी दिवाकर रावते यांच्याकडे तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे असेल. मराठवाडा व नगरची संघटनात्मक जबाबदारी रामदास कदम यांच्याकडे तर सांगली, सातारा कोल्हापूरची जबाबदारी गजाजन कीर्तीकर यांच्याकडे असेल. सुभाष देसाई यांच्यावर ठाण्यासह कोकण विभागाची जबाबदारी राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 19 =