ट्युडे प्रवाह – पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे स्पेन दौऱ्यावर, आयुक्त श्रावण हर्डीकर स्वीडन दौऱ्यावर गेले असतानाच आता पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण हेही परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दोघांचा फिलिपाईन्स दौरा खासगी संस्थेने स्पॉन्सर केल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. मात्र, करदात्या नागरिकांच्या खर्चाने पालिका पदाधिकारी,अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या परदेश दौऱ्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांच्या दौऱ्यासाठी करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. महिला व बालकल्याण समितीचे सदस्य सिंगापूर दौरा करुन आले. पाठोपाठ बीआरटी विषयक माहिती जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक अधिकारी अहमदाबादला जाऊन आले.
महापौर नितीन काळजे सोमवारी (दि.13) युरोपमधील स्पेनच्या दौऱ्यावर गेले आहेत. बार्सिलोना शहरात आयोजित “स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस 2017′ या परिषदेत ते सहभागी झाले आहेत. 21 नोव्हेंबर रोजी ते दौऱ्यावरुन परतणार आहेत. महापौर शहरात येतील तोपर्यंत श्रावण हर्डीकर शनिवारी स्वीडनकडे रवाना झाले आहेत ते पुढील शनिवारी (दि. 25) शहरात परतणार आहेत. पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण हेही परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. फिलिपिन्स येथे विकास परिषदेच्या वार्षिक सभेत सहभागी होण्यासाठी पोमण आणि लांडे रवाना झाले आहेत. ते पाच दिवसांनी दौऱ्यावरुन परतणार आहेत. या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. या दौऱ्याचा खर्च एका खासगी संस्थेने केला आहे. त्यामुळे दौऱ्याचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसुल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पाडुरंग परचंडराव यांनी केली आहे.