टुडे प्रवाह – महापालिका निवडणुकीमुळे पदाधिकारी, समित्यांची निवड करण्यास विलंब झाल्यामुळे चालू वर्षाची दैनंदिनी छापण्याचे नियोजन कोलमडले होते. मात्र, 2018 मध्ये आठ हजार डायऱ्या छापण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पुढील वर्षात नागरिकांना पालिकेची माहिती संग्रहित ठेवण्यासाठी छापील दैनंदिनी उपलब्ध होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी दैनंदिनी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकांचा समावेश असतो. त्यामुळे कोणता विभाग कोणत्या अधिकाऱ्यांकडे हे लगेच समजते. त्याचबरोबर शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, वृत्तपत्र आणि खासगी न्यूज चॅनेलच्या कार्यालयांचे पत्ते व संपर्क क्रमांक नमूद केलेले असतात. तसेच, पुणे जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार तसेच, मंत्र्यांचे संपर्क क्रमांक असतात. पिंपरी-चिंचवड शहरासंदर्भातील सविस्तर माहिती दिलेले असते.
दैनंदिनीमुळे नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना महापालिकेशी संबंधित माहिती घेणे सुलभ होते. त्यामुळे दरवर्षी या डायरीची नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरीक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपचे कारभारी महापालिकेत आले. महापौर, उपमहापौर या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि स्थायी समितीसह विविध विषय समित्या, क्षेत्रीय कार्यालय समितींच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यास अधिक काळ गेला. त्यामुळे सत्ताधारी भाजपने 2017 ची महापालिकेची दैनंदिनी न छापण्याचा निर्णय घेतला होता.
महापालिकेच्या पुढील 2018 या आर्थिक वर्षासाठी डायरी छापण्यात येणार आहेत. एका डायरीसाठी 103 रूपये 50 पैसे खर्च अपेक्षित आहे. एकूण 8 हजार डायऱ्या छापण्याचे तयारी केली आहे. त्यासाठी 8 लाख 28 हजार रूपये खर्च येणार आहे. डायऱ्या चिंचवड येथील आशिष एंटरप्रायेजसकडून छापून घेण्यात येणार आहेत. त्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यावर पदाधिकारी तसेच अधिकारी यांच्यात चर्चा होऊन मंजुरीबाबतचा निर्णय स्थायी समिती घेणार आहे.