टुडे प्रवाह – यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या वैद्यकीय सुविधेतील अनियमितता आणि प्रत्येक कामासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सल्लागार नेमणुकीच्या प्रस्तावावरून विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी डॉक्‍टरांना बढत्या दिल्यानंतर “वायसीएम’ रुग्णालयाची परिस्थिती सुधारणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला. तर, विरोधक काही चेंडू सोडून द्यायचे म्हणून टीका करतात, त्यात काहीही तथ्य नसते. त्यामुळे सर्वच चेंडू खेळायचे नसतात, असा टोलाही सत्तारुढ पक्षनेते पवार यांनी लगावला.

डॉक्‍टरांच्या पदोन्नतीचे विषय समोर आल्यानंतर विधी समितीने महिनाभरापासून हे विषय रोखले आहेत. “लक्ष्मी’दर्शनासाठी हे विषय रोखून धरल्याचे आरोप सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर झाले. यावरून विधी समितीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचाही आरोप करण्यात आला. प्रशासकीय सेवा कार्यकाळ मर्यादेनुसार पदोन्नतीसाठी पात्र अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात मांडवली होत नसल्यामुळेच प्रस्ताव तहकूब ठेवल्याचे आरोप विधी समितीवर विरोधकांनी केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली असून, या टिकेला काय प्रत्युत्तर द्यावे? या संभ्रमात पदाधिकारी अडकले आहेत. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी पत्रकारांशी बोलताना “वायसीएम’ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडली असून, त्यावरून सत्ताधाऱ्यांना “टार्गेट’ केले होते. रुग्णालयाची पाहणी करून प्रसिध्दी मिळवली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुधारणा करण्यासाठी कोणताही निर्णय घेतला नसल्याचा आरोप बहल यांनी एकनाथ पवार यांचे नाव न घेता केला होता.

बहल यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ पवार म्हणाले की, वैद्यकीय उपअधीक्षकपदी डॉ. शंकर जाधव यांची पदोन्नती करण्यास काही डॉक्‍टरांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, डॉक्‍टरांना बढत्या दिल्यावर लगेच “वायसीएम’ची परिस्थिती सुधारणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. टप्प्याटप्प्याने सुधारणा घडवून आणण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मार्गी लागत आहे. त्यामुळे पुढील काळात गैरसोय कमी होऊन अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर दिला आहे, असेही पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + 14 =