टुडे प्रवाह – नर्मदा नदीच्या काठी केलेल्या विक्रमी वृक्षरोपणामुळे मध्य प्रदेश प्रदेश सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. वृक्षरोपणाच्या या उपक्रमातंर्गत अवघ्या १२ तासांमध्ये ६ कोटी झाडे लावण्यात आल्याचा दावा मध्य प्रदेश सरकारकडून करण्यात येत आहे. या विक्रमाची नोंद गिनेस बुकमध्ये व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार सकाळी सात ते संध्याकाळी सात या काळात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राज्याच्या २४ जिल्ह्यांतील एकूण १५ लाख स्वयंसेवक सहभागी झाले होते. हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे. हे सर्व पाहून आयुष्य सार्थकी लागल्याची भावना माझ्या मनात दाटून आल्याची प्रतिक्रियाही त्यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली होती.

मध्य प्रदेशचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शुक्ला यांनी म्हटले की, फक्त जनसंपर्क खात्याकडूनच ३ कोटी रोपं लावण्यात आली. सध्या उर्वरित जिल्ह्यातील वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाची आकडेवारी जमा करण्याचे काम सुरू आहे. ही मोजणी पूर्ण झाल्यानंतरच नेमका आकडा समजू शकेल. मात्र, आमच्याकडे आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार वृक्षारोपण कार्यक्रमातंर्गत सहा कोटी रोपं लावण्यात आली आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण होणे, हा विक्रम ठरू शकतो. त्यामुळे आता मध्य प्रदेशचे नाव गिनेस बुकात नोंदवले जाणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

महाराष्ट्रातदेखील काही दिवसांपूर्वी ४ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभाच्या करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहनमंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सद्गुरू जग्गी वासुदेवजी, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम आदींची उपस्थिती होती. जल, जंगल आणि जमीन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यामुळे आगामी काही वर्षांत पर्यावरणाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 3 =